प्रत्येक शाखेला लागणारी क्षमता आणि कल प्रथमतः समजून घेतले पाहिजे. त्या नंतर आपल्या पाल्याच्या क्षमता आणि कल जाणून घेतला पाहिजे. आपल्या पाल्याला इयत्ता आठवी ते दहावी मध्ये गणित आणी शास्त्र या विषयात किती मार्क पडले आहेत, त्याचा विचार करावा. त्याला का, कसे, कशाला असे प्रश्न पडतात का ? त्याला काय करायला आवडते, काय करायला जमते याचा विचार करावा. मुलांना क्रिकेट खूप आवडते, तो आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा खेळला आहे का ? त्याला खेळायला जमतेच असे नाही. क्रिकेट खेळाविषयी संपूर्ण माहिती असतेच असे नाही. क्रिकेट हा खेळ म्हणून मॅच बघायला आवडेल. प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळायला आवडेल किंवा जमेल असे नाही. काही मुलांना कॉम्प्युटर खूप आवडतो, म्हणून कॉम्प्युटर मध्ये करियर करेलच असे नाही. त्या मुलाला कॉम्प्युटरची तांत्रिक माहिती असेल असे नाही. त्याला मदरबोर्ड कुठल्या कंपनीचा, त्याची रॅम किती, हार्डडिस्क किती जीबीची, ऑपरेटिंग सिस्टिम कुठली ती कशी इन्स्टॉल करावी, कुठली सॉफ्टवेअर आहेत, ती कशाला लागतात, ब्राऊझर कुठला वापरतात ? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याची माहिती असेल तर नक्की त्याचा विचार करावा. म्हणूनच प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या क्षमता आणि कल ओळखूनच शाखा निवडावी.